मुस्लिमांना आरक्षण देण्यास तयार - तावडे

Foto

मुंबई- राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही; परंतु मुस्लिम धर्मातील जो मागास समाज आहे त्यांना आरक्षण देण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत मांडली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली.

 

मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत धनगर व मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सध्या आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही. धनगर आरक्षणासंदर्भात एक दिवसाचे विशेष अधिवेशन भरवावे, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली, तर मराठा आरक्षण मंजूर झाले, धनगर आरक्षणासंदर्भातही सरकारने स्पष्टीकरण दिले.

 

मात्र, मुस्लिम आरक्षणावर सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना  शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्माला आरक्षण देता येणार नाही. मात्र, मुस्लिम धर्मात कुरेशी व अन्य समाज येतात. यातील मागास समाजाला आरक्षण देण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.